कोल्हापूर : गेल्या पंधरा वर्षाहून अधिकाळ कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे नगरसेवक शारगंधर वसंतराव देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आज केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.
आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथील एका मंगल कार्यालयामध्ये उत्तर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी पाच हजार पेक्षा जास्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथे हजेरी लावली होती. त्यामध्ये महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. तसेच महापालिकेमधील शंभरहून अधिक आजी माजी महापौर, नगरसेवक, नगरसेविका व उत्तर मधील अनेक तरुण मंडळे, तालीम संस्था, महिला बचत गट यांचा प्रामुख्याने समावेश होता.
यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर म्हणाले शारगंधर देशमुख राजकीय सामाजिक कार्यामध्ये गेली 20 वर्ष कार्यरत आहे. तसेच महापालिकेत त्यांनी काँग्रेस गटनेते,स्थायी समिती सभापती, नगरसेवक यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून प्रशासनामधे कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर उपनगरातील सर्व तरुणांना एकत्र करून संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा केला आहे.तसेच साने गुरुजी परिसरामध्ये अनेक प्रभागांमध्ये कोट्यावधी रुपयांची
विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली. माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण केली आहे. शहरातील अनेक प्रलंबित विकास कामांची त्यांना जाणीव असल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना उत्तरेतून उमेदवारी द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांच्याकडे या मेळाव्याच्या निमित्ताने करत आहे. धनंजय सावंत म्हणाले, देशमुख यांची नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची पद्धत वेगळी आहे. महापालिकेच्या प्रशासनामध्ये आपल्या कामाची त्यांनी मोहर उठवली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तरेची लढाई जोरात होणार असून शारंगधर देशमुख यांना उमेदवारी दिली तर ते प्रचंड मताने निवडून येणार आहेत. माजी नगरसेवक सुजय पोतदार म्हणाले जनतेचे खंबीर पाठबळ देशमुख यांना मिळत आहे.त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते निकालाचे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे त्यांना उत्तरेतून उमेदवारी मिळावी. खंडोबा तालमीचे माजी उपाध्यक्ष सुनील मोरे म्हणाले, देशमुख यांचेकडू कौशल्य, निर्णय क्षमता,निस्वार्थी असे अनेक गुण आहेत. तसेच त्यांना सामाजिक कार्याची जाणीव आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील. माजी नगरसेविका माधुरी लाड म्हणाल्या, देशमुख यांचा प्रशासनामध्ये दरारा आहे. एखादे काम त्यांनी हाती घेतले पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. दीपक पाटील म्हणाले महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे. शारंगधर देशमुख यांना उमेदवारी दिली तर मोठ्या मताधिक्याने ते विजयी होणार आहे.
गणी आजरेकर म्हणाले, देशमुख यांना जनसमुदायातून मोठा पाठिंबा व्यक्त होत असून उत्तरेतून त्यांना उमेदवारी मिळावी .यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, अभिजीत चव्हाण, अर्जुन माने, उदय फाळके,अशोक बारामते, बाळासाहेब मुधोळकर, करण शिंदे, भैय्या शेटके, संजय कदम, अभिजीत खतकर,जहांगीर पंडित, दीपा मगदूम, शोभा कवाळे, रिना कांबळे आदी उपस्थित होते.