भाजप नेत्या नीता कळेकर यांच्या पुत्राची 36 लाखांची फसवणूक

सांगली : भाजप नेत्या नीता कळेकर यांच्या पुत्राची 36 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुचाकीचे सुटे भाग न पुरवता वितरकाची 36 लाख रुपयांची फसवणूक केली आहे . याप्रकरणी हरियाणा येथील पाच जणाविरोधात संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जितेंद्र शर्मा, रूपाली शर्मा, राजेश शर्मा, अभिमन्यू बादल, विकास रात्रा (सर्व मूळ रा.कॉर्पोरेट कार्यालय गिरगाव, सध्या रा. एअर इंडिया कार्यालयाशेजारी गुरुग्राम, हरियाणा) अशी संशयतांची नावे आहेत. हा फसवणुकीचा प्रकार 5 मार्च 2021 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत घडला. सारंग केळकर हे विद्युत दुचाकीचे सांगलीतील वितरक आहेत. माधवनगर रस्त्यावर त्यांचे शोरूम होते. त्यासाठी ते संशयिताकडून वाहने आणि त्यांचे सुटे भाग खरेदी करत होते. वाहनासाठी त्यांनी संशयिताच्या ओकिनावा ऑटोटेक या कंपनीकडे दोन लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती. सुट्ट्या भागासाठी तीन लाख 13 हजार 311 रुपये भरले होते. दुचाकी खरेदीसाठी 22 लाख 67 हजार रुपये भरले. संशयिताने त्यासाठी वेगवेगळ्या बँका त्याचे क्रमांक दिले होते. त्यावर सारंग केळकर यांनी वेळोवेळी पैसे भरले.

पैसे भरल्यानुसार वाहनांची सुटे भाग व दुचाकी मिळावी यासाठी त्यांनी कंपन्याकडे वारंवार पाठपुरावा केला. पण संशयिताने दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. फसवणुकीचा एकंदरीत आकडा 35 लाख 86 हजार 685 रुपये होता. पोलिसांनी या पाच संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.