कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत कुंभोज ग्रामसभेत वादळी चर्चा !

कुंभोज : कुंभोज (ता. हातकणंगले)येथील ग्रामपंचायत तहकुब झालेली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय कुंभोज येथे घेण्यात आली. यावेळी कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासनात अनेक प्रश्नांचा भडीमार झाला. परिणामी तब्बल चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र किरकोळ कामासाठी बंद असून हे केंद्र बंद असल्याने कुंभोज परिसरातील अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारात आपला जीव गमवावा लागला आहे. परिणामी सध्या कुंभोज आरोग्य केंद्राचा गैरवापर केला जात असून सदर जागा केवळ नावापुरतीच आरोग्य केंद्र राहिले आहे.

परिणामी कुंभोज आरोग्य पथकासाठी मिळालेली ॲम्बुलन्स सध्या राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या आरोग्य केंद्रात कार्यरत असून ती ॲम्बुलन्स कुंभोज ला पुन्हा मिळावी यासाठी जनतेतून उद्रेक झाला आहे. परिणामी येणाऱ्या दोन आठवड्याच्या आत सदर आरोग्य केंद्र उद्घाटन घेऊन करून चालू करू असे आश्वासन ग्रामपंचायत कुंभोज च्या पदाधिकाऱ्यांनी गाव सभेच्या दरम्यान दिले.

परिणामी कुंभोज ग्रामसभेसाठी आवश्यक असणारा अधिकारी वर्ग सदर ग्रामसभेला उपस्थित न राहिल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग महसूल विभाग, शिक्षण विभाग यातील कोणताही अधिकारी व कर्मचारी गाव सभेला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांना गाव सभेचा उपस्थित न राहण्याचा अहवाल त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवावा असा ठराव करण्यात आला. त्याच पद्धतीने कुंभोज परिसरातील शाळांच्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच शाळांमध्ये असणाऱ्या सर्वच मुलींच्या वर शिक्षकांच्या बरोबरच गावातील ग्रामपंचायतीने शालेय मुली दक्षता कमिटी नेमून नियंत्रण ठेवावे अशी मागणी महेश माळी यांनी केली.

तसेच शासन व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवत असून त्याची सुरुवात शाळेतून होणे गरजेचे आहे परिणामी अनेक शिक्षक सध्या शाळा आवार परिसरात तंबाखूचे सेवन करताना दिसत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच कुंभोज परिसरात अनेक ठिकाणी अनेक रस्ते मंजूर झाले असून सदर रस्त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड लावण्यात आला आहे. परंतु सदर कामे अद्याप का चालू झाली नाहीत असा सवालही उपस्थित ग्रामस्थांच्यातून करण्यात आला.

यावेळी कुंभोज मध्ये माळी समाज मातंग, धनगर समाज तसेच दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मशानभूमीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची मागणी करण्यात आली. तसेच कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राचे उभारणी करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त करून सदर ठेकेदारावर लाल शेरा मारण्यात यावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

तसेच यावेळी कुंभोज आरोग्य पथकात सध्या डॉक्टरांचे काम आरोग्य सेवक व शिपाई यांच्याकडून केले जात असून कोणत्याही पद्धतीची चुकीची उपचार पद्धती झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कुंभोज केंद्र व कुंभोज पथकाकडे असलेले दुर्लक्ष याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे ,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, अजित देवमोरे अमरजीत बंडगर, भरत भोकरे शुभांगी माळी ,माधुरी घोदे, विशाखा माळी, जयश्री महापुरे, भारती पोतदार दावीत घाटगे ,सदाशिव महापुरे संभाजी मिसाळ तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.