कोल्हापूर: समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात 3 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जाहिरात समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया,गद्दारी गाडुया”असा इशारा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री मुश्रीफ यांना त्यांनी दिला आहे.
समरजीतसिंह घाटगे हे भाजपच्या माध्यमातून 10वर्ष विधानसभेची तयारी करत आहेत. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये कागलची जागा शिवसेनेला गेल्यानंतर समरजीत सिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी 88 हजार मते घेतली. यावेळी ची निवडणूक अपक्ष न लढता कोणत्यातरी पक्षाकडून लढण्याचे संकेत त्यांनी दिले होते. 23 ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
हा पक्षप्रवेश 3 सप्टेंबरला कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सभेच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. यामध्ये “वस्ताद येत आहेत, मैदान तेच डाव नवा,84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया,गद्दारी गाडुया” अशी लिहिलेली विधाने लक्षवेधी ठरली आहेत.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हाध्यक्ष व्ही.व्ही.पी पाटील यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत.