कोल्हापूर: बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा विपर्यास, आणि अत्याचाराच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईसाठी आज सकल हिंदू समाजाकडून कोल्हापूर बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या या बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील बाजारपेठेत शांतता असून सर्व दुकाने बंद असल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर यासह शहरातील सर्व प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे सध्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.