डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फॉलिक ऍसिड निदान पद्धतीसाठी पेटंट

कार्बन क्वांटम डॉट्स नॅनोपर्टिकल्सचा वापर करून शरीरामधील फॉलिक ऍसिडचे निदान करणाऱ्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे. कॅन्सर, अल्झिमरसारख्या आजारांच्या निदानासाठी हि पद्धती उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाला मिळाले हे ४४वे पेटंट आहे.

फॉलिक ऍसिडच्या अभावामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: गर्भवती महिलासाठी योग्य प्रमाणात फॉलिक ऍसिड आवश्यक आहे. त्यामुळे नवजात बाळाचे आरोग्य उत्तम राहते आणि न्यूरल ट्यूब दोष होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे फॉलिक ऍसिडचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डीपार्टमेंट ऑफ मेडिकल बायोटेक्नोलॉजी अँड स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे आणि पीएच.डी संशोधन विद्यार्थिनी अनुजा विभुते यांनी फॉलिक ऍसिडचे निदान करणाऱ्या या नव्या पद्धतीचे संशोधन केले आहे.

विद्यापिठाच्या संशोधकांनी विकसित केलेली ही फॉलीक ऍसिड निदान पद्धत कॅन्सर, अल्झिमर, न्युरल ट्यूब डीफेक्ट, हृदयविकार, डिप्रेशन अशा वेगवेगळ्या आजारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सरफेस फंक्शनालाइज्ड कार्बन क्वांटम डॉट्स नॅनोपर्टिकल्सचा वापरून शरीरातील सिरम आणि युरिनमधून फॉलीक ऍसिड निदान शक्य होणार आहे.

कुलपती संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही भोसले यांनी या संशोधनाबद्दल संशोधकांचे अभिनंदन केले.