“पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे…” : शरद पवार

शरद पवार या वयात आपले कुटुंब सांभाळू शकले नाहीत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. या टीकेला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र मी व्यक्तिगत टीका करणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. 

“पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर केली होती. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना पवारांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण असं व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मीही हे पथ्य पाळू नये, ही भूमिका काही योग्य होणार नाही”, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

“पंतप्रधान मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. पण त्या अमलात आलेल्या नाहीत. पंतप्रधान बेछूटपणे काही गोष्टी सांगत असतात. पण सरकारला ते करणं झेपेल की नाही? सरकारची तशी स्थिती आहे की नाही? याचा विचार ते करत नाहीत, म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे”, अशी टीका शरद पवार यांनी केली.