नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश …. काय आहे प्रकरण?

कल्याणच्या एका माजी नगरसेवकाने २४ तासांत दोन पक्ष बदलल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी दिवसभरात दोनदा पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी काही तासांमध्येच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकाराची राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

काय सांगतात पुरुषोत्तम चव्हाण ?

पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितलं की, मी वैयक्तिक कामासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी गेलो होतो. पण, त्यांनी माझ्या हातात झेंडा दिला. मी गेलो त्यावेळी डोंबिवलीतील काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सुरु होता. त्यावेळी माझ्याही हातात झेंडा देत त्यांनी पक्षप्रवेश करुन घेतला. मला त्यावेळी काहीही कळालं नाही. माझे शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा त्यांनी खूप मदत केली होती.

पुरुषोत्तम चव्हाण यांच्या घरवापसीनंतर ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुले पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी सध्या कल्याणमध्ये सक्रिय दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावध राहावे, असं ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर म्हणाल्या आहेत. दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्यांचा सामना शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे.

शिंदे गटाने यावर नेमके काय म्हटलंय?

‘पुरुषोत्तम चव्हाण यांनी स्वताच्या मर्जीने शिंदे गटात प्रवेश केला होता. पण, ते आता नाकारत आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक हे आरोप केले आहेत. एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्याने काय फरक पडत नाही.’ दरम्यान, सदर घटनेमुळे राजकारणात आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा ऐकायला मिळाला. असे शिंदे गटाने यावर म्हंटले आहे.