इचलकरंजी, ता.३० : मतदारसंघात विकास कामासाठी अधिकाधिक निधी खेचून आणणे व देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयावर संसदेत आवाज उठवण्याची जबाबदारी धैर्यशील माने यांनी चोखपणे पार पाडली आहे. आपले मत धैर्यशील मानेंना म्हणजेच नरेंद्र मोदीला असेल. देशाला योग्य दिशेने घेऊन जाणारा नेता हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे देशाला दिशा देणारे आपले मत असणार आहे,असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
दत्तवाड (ता. शिरोळ ) येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले , नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान झाल्यापासून देशाचा विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे काम केले जे ७० वर्षात झाले नव्हते. तसेच नुकतेच एफआरपीत तीनशे रुपयांची भरघोस वाढ केली. 2013 -14 ला 1700 रुपये असणारी एफ आर पी आता 3100 झाल्याचे सांगितले. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने म्हणाले , कोरोना काळामुळे मतदार संघातील काही गावात जाणे शक्य झाले नसले तरी मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल ८ हजार २०० कोटी रुपये निधी खेचून आणला आहे. यापुढील काळात खासदारकीची संधी दिली तर धैर्यशील माने मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामासाठी मोठा निधी खेचून आणू शकेल असा विश्वास दिला.

रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही लढाई भारत विरुद्ध इंडियाची आहे. आज केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार रुपये देण्याचे महत्त्व पूर्ण काम केले आहे. देशाला एकसंध नरेंद्र मोदीच ठेवू शकतात. कारण त्यांची नाळ तिरंगा झेंड्याशी जोडली गेली आहे,असे सांगितले.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक जाधव, नूतन कुमारी यांची मनोगते झाली.यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, राहुल घाटगे, डॉ.राहुल आवाडे, आदित्य पाटील यड्रावकर, मुकुंद गावडे, राजगोंडा पाटील, बबन चौगुले, डी एन सिदनाळे, सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच अकबर काले, अशोक पाटील, बाळासो शिंदे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगुले यांनी मानले.

त्यांनतर दानोळी येथे सभा झाली. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि आगामी लोकसभा निवडणुकीत जोमाने काम करून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले. माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, सरपंच सुनिता वाळकुंजे, माजी सरपंच बापूसाहेब दळवी, गुंडू दळवी, युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, पैलवान केशव राऊत, संजय नांदने, बबन यादव, दिलीप रणवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
