गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता सुरू असलेल्या अभियानाला मुदतवाढ

मुंबई: 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवण्याकरिता कटिबद्ध आहे. म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आज दिली.

यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1, 50, 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.