(सतीश पाटील) शिये : शिये (ता. करवीर ) येथील कारसेवक निवास पाटील यांनी १९९२ च्या कारसेवेनंतर श्रीराम जन्मभूमीवर मंदिर होत नाही तोपर्यंत पायात वाहना ( चप्पला ) घालणार नाही असा संकल्प केला होता. तब्बल ३१ वर्षांनी त्यांचा संकल्प पूर्णत्वास आल्यांने शिये परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
रामभक्त म्हणून ओळखले जाणारे निवास भाऊसो पाटील यांनी १९९२ च्या कारसेवेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या संकल्पला आता ३१ वर्ष पूर्ण होऊन त्यांचा संकल्प आत्ता फळाला आला आहे.त्या निमित्त गावच्या वतीने त्यांचा २२ जानेवारी रोजी नागरी सत्कार होणार आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निवास पाटील यांनी १९८४ साली शिये गावात जय भवानी क्रीडा मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. १९८६ साली हिंदू एकता आंदोलनच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सायं शाखा सुरू करण्यात आली. तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या देश, देव आणि धर्म कार्याची सुरुवात झाली.
सुरुवातीला मंडळातील सर्व मुलांना घेऊन ऊसाचे बी सोलून पैसे जमविले. आणि गावाच्या पूर्वेला असणाऱ्या व पडझड झालेल्या श्री म्हसोबा मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघाच्या वेगवेगळ्या जबाबदारी घेऊन आपल्या गावच्या आजूबाजूच्या १५ ते २० गावांमध्ये संघाचे काम उभे केले .पुढे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमीच्या मुक्ती आंदोलनाची सुरुवात झाली. त्यामध्ये प्रत्येक गावातून एक वीट गोळा करून श्रीरामांच्या मंदिरासाठी आयोध्येत पाठवणे.
या कार्यात सर्वांच्या बरोबर जवळजवळ सात ते आठ गावांमध्ये शीला पूजन करून त्या शिलेचे आयोध्येला पोहोच करण्यात बहुमोल योगदान देऊन तेथून पुढे चालू झालेल्या कारसेवेत १९९२ प्रत्यक्ष सहभाग घेतला. शिये परिसरात श्री शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी २८ गड मोहिमेत थेट सहभाग घेतला आहे. तसेच शिवप्रतिष्ठांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचे आयोजनात सक्रिय सहभाग आहे.
२०१० साली शिवस्मारक समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात मोलाचा वाटा आहे. तसेच २०१७ साली ग्राम दैवत हनुमान मंदिराच्या कार्यात सहभाग तसेच भुजंगेश्वर सेवा समितीच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सव व स्मशानभूमी सुशोभीकरण करण्याच्या कामात मुख्य सहभाग घेतला. अशाप्रकारे त्यांचा गावातील विविध धार्मिक सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो.
दरम्यान त्यांच्या या अनवाणी चालण्याच्या संकल्पा बद्दल विचारले असता, श्री पाटील म्हणाले कारसेवकांनी दिलेले बलिदान आणि विशेषता कोठारी बंधूंच्या बलिदानापुढे हा संकल्प काहीच नाही. तमाम हिंदूंची श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्री रामांचे मंदिर उभे राहत हे पाहणे आमचे भाग्यच आहे.या सुवर्ण क्षणाची कित्येक वर्ष वाट पाहत होतो. तो जवळ आल्याने आनंद होत आहे.
…………………..