नवी दिल्ली: भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याबाबत म्हटले आहे.विवेक रामास्वामी यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केली.
यादरम्यान रामास्वामी म्हणाले की, आता माझ्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक नाही. 15 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी पहिली कॉकस आयोजित करण्यात आली होती. आयोवा येथे ही कॉकस झाली आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले.
विवेक रामास्वामी यांनी यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय केवळ निक्की हेली आणि रॉन डीसँटिस हे या शर्यतीत उरले आहेत. विवेक रामास्वामी या तिघांच्या मागे होते आणि आता आयोवा कॉकसच्या निकालात पिछाडीवर पडल्यानंतर विवेक रामास्वामी यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विवेक रामास्वामी अमेरिकन राजकीय दृश्यात एक अज्ञात चेहरा होता, परंतु फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, विवेक रामास्वामी यांनी रिपब्लिकन मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. रामास्वामी अल्पावधीतच त्यांच्या इमिग्रेशनबद्दलच्या ठाम मतांमुळे आणि त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणामुळे मतदारांमध्ये खूप लोकप्रिय झाले. मात्र, आता रामास्वामी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत खूपच मागे पडले होते. रामास्वामी आयोवा कॉकसमध्ये चौथ्या स्थानावर राहिले आणि त्यांना केवळ 7.7 टक्के मते मिळाली.
विवेक रामास्वामी हे अब्जाधीश व्यापारी आणि बायोटेक कंपनीचे प्रमुख आहेत. रामास्वामीचे आई-वडील भारतातील केरळचे रहिवासी होते, जे अमेरिकेत स्थायिक झाले होते. रामास्वामी यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो राज्यात झाला. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले होते. तर ट्रम्प यांनीही रामास्वामी यांचे समर्थन केले होते.
