पुरस्कार स्वीकारण्याची संधी कर्मचाऱ्यांना देऊन शाहू साखर कारखान्याने केला गौरव

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळालेला’सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार स्वीकारण्याची संधी पदाधिकाऱ्यांसमवेत सात कर्मचाऱ्यांना दिली आहे.पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी(ता.११) होत आहे. त्यासाठी शाहूचे सात कर्मचारी आजच पुण्याला रवाना झाले.यातून ‘शाहू’ने कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने गौरवच केला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून गळीत हंगाम २०२२-२३मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी यांच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली. त्यामध्ये स्व. वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ हा पुरस्कार सहकार महर्षी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या शाहू साखर कारखान्यास जाहीर झाला. कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी खंडेनवमीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांशी स्नेह भोजनची परंपराच जपताना यापुढे कारखान्यास पुरस्कार मिळाल्यास तो स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही संधी दिली जाईल.असा शब्द दिला होता.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सात कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांनी तो पाळला.

कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांतून ड्राॕ काढून नावे निवडली.या कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग चार तसेच मजूर श्रेणीतील  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे रघुनाथ निकम हे येत्या एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.तर उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काहीजण दोन महिन्यांनी तर काहीजण चार महिन्यांनी सेवानिवृत्त होत आहेत. सेवा कालावधीच्या अंतिम टप्प्यात कारखान्याकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.यामध्ये रघुनाथ निकम, कृष्णा पाटील, दिनकर निकम, श्रीकांत गवळी, मारुती यादव, बाळू कांबळे, शहाजी पाटील, यांचा समावेश आहे.


राजे समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष,शाहू ग्रुप)

स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून कारखाना प्रशासन व कामगार यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनाही पुरस्कार स्वीकारण्याची संधी दिली आहे.


बाळू कांबळे (मजूर,शाहू साखर कारखाना)

शाहू साखर कारखाना स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चातही समरजितराजेंच्या नेतृत्वाखाली यशाच्या शिखरावर विराजमान आहे.याचे आम्ही साक्षीदार आहोत.कारखाना शेतकरी व कामगार यांच्या श्रमाचे मंदिर आहे.हा पुरस्कार स्वीकारण्यास जात असताना आमचा ऊर अभिमानाने भरून आला.आम्हाला पुरस्कार स्वीकारण्याची संधी देऊन सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे.