हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील नरंदे ते खोची दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रहदारीचा आणि सोयीचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती.
याची दखल घेत माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत या रस्त्यासाठी निधी देण्याविषयी पत्रव्यवहार केला होता.
दुरुस्ती अभावी रस्त्यावरील वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू असून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे ही बाब महाडिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नरंदे ते खोची या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल 1 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी माजी आमदार अमल महाडिक यांचे आभार मानले आहेत.