मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय नावांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तिने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नऊ वर्षांपूर्वी तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील अभिनेता शशांक केतकरशी लग्न केले होते.
प्रेक्षकांना तेजश्री आणि शशांकची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी आडत होती तशी ऑफस्क्रीन देखील आवडत होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. आता घटस्फोटाच्या ९ वर्षांनंतर तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तेजश्रीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असून होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणते गूण हवेत याचादेखील खुलासा केला आहे. तेजश्री म्हणाली, “एखाद्याच्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा आपण कोलमोडतो, थांबतो, ब्रेक घेतो. मी शेवटी स्वत:ला समजावले की नीट राहायचे असेल तर काम करणे गरजेचे आहे. लोकांना असे वाटते की, मी करिअरकडे जास्त लक्ष देते. अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यही ऐकली आहेत.”
पुढे लग्नाविषयी बोलताना तेजश्री म्हणाली की, “लग्नासाठी मला फार स्थळे येत नाहीत. मला कुटुंब आवडते. मला कुटुंब हवे आहे. मला लग्न करायचे आहे. लग्न करायचे आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या २४-२५ व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचे आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडते. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो.”
तेजश्रीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत दिसत आहे. यापूर्वी तिने ‘अग्गबाई सासूबाई’,’होणार सून मी या घरची’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. तिने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत श्रीची भूमिका साकारणारा शशांक केतकरशी ८ फेब्रुवारी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. आता तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.