जिल्हा क्रीडा अधिकारी १ लाख १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयात पुरवण्यात आलेल्या साहित्याचे बिल मंजूर करण्याकरता तक्रारदाराकडून १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वय -४५ रा. राजगृह हाऊसिंग सोसायटी- विश्रामबाग सांगली ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पथकाने मंगळवारी (दि ३ रोजी) अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार, हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी ऑनलाईन महा टेंडर वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य हे आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते.

या साहित्याचे एकूण बिल हे 8,89,200/- रुपये झाले होते. सदर बिल मंजूर करण्यासाठी संशयित आरोपी क्रीडा अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे एकूण बिल रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागणी केली. तडजोडीअंती 1,10,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारताना मंगळवारी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, बापू साळुंखे, पोलीस निरीक्षक, संजीव बंबरगेकर,पोहेकॉ सुनील घोसाळकर, सचिन पाटील , मयूर देसाई, रुपेश माने,संदीप पोवार,विष्णु गुरव यांचेसह पथकाने केली.

🤙 9921334545