कोल्हापूर : खासदार मुन्ना महाडिक यांनी बंटी पाटलांचे पहिल्यांदाच जाहीरपणे कौतुक केले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या विषयावरच चविष्टपणे चर्चा रंगल्या आहेत.थेट पाईपलाईनचे पाणी आल्यावर आम्ही काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे स्वागत करू,असं भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी एसी बस सतेज पाटील यांनी कोणत्या निधीतून आणल्या माहीत नाही. पण कोल्हापूरकरांना सुविधा मिळत आहेत हे महत्त्वाचं असे असे उद्गार काढले.आपण देखील कोल्हापुरात 100 इलेक्ट्रिक बस आणणार असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.
थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात येणार आहे. त्या कामाचे आम्ही देखील स्वागत करणार. पण थेट पाईपलाईनचे काम किती वर्षे चाललं, अजून किती वेळ लागणार यात जात नाही. चांगल्या कामाबद्दल चांगलं म्हटलं पाहिजे. पण आम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं स्वागत सतेज पाटील करत नाहीत, असंही धनंजय महाडिक म्हणाले.
जे चांगलं काम होईल त्याचं कौतुकच होणार आहे. उद्या थेट पाईपलाईन जरी पूर्ण झाली तरी आम्ही त्यांचं कौतुक करू, अभिनंदनच करू. भविष्यात देखील विकासकामं करत असताना एकमेकांचे श्रेय मी तर कधीच घेत नाही आणि दुसऱ्यांनी देखील तसंच करावं चांगल्या कामांचे कौतुक करावं, असा अप्रत्यक्ष सल्ला महाडिकांनी सतेज पाटलांना दिला.