
मुंबई : अभिनेत्री दीपाली सय्यद अखेर निवडणूक लढणार आहे. विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढण्याची दीपाली सय्यद यांनी तयारी सुरू केली आहे. एका बड्या नेत्याची भेट घेतल्यानंतर अखेर दीपाली सय्यद निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता दीपाली सय्यद यांनी मतदारसंघाचाही शोध सुरू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दीपाली सय्यद या महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा संसदेत दिसण्याची शक्यता आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या शिंदे गटात जाणार होत्या. पण भाजपने त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकला नव्हता. त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यामुळे त्या काहीशा सक्रिय राजकारणातून अडगळीत पडल्या होत्या. मात्र, आता त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा किंवा विधानसभेला परिस्थिती पाहून दीपाली सय्यद यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दीपाली यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.