
कोल्हापूर : दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर उठायचे आणि सभासदांचा कळवळा आल्याचे सोंग करायचे ही बंटी पाटील यांची सवय आहे. पण आता सभासदांनीच त्यांचे ढोंग ओळखले आहे अशी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. गावोगावी सभासदांच्या जाहीर सभा आणि पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यवलुज येथे झालेल्या सभेत अमल महाडिक यांनी विरोधकांना चांगलंच झोडपलं. दरवेळी एकच कॅसेट वाजवणाऱ्या बंटी पाटलांनी मी विचारलेल्या प्रश्नांची अजूनही उत्तरे दिलेली नाहीत. आम्ही मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
गावोगावी उत्तराचे डिजिटल फलक उभारले आहेत. आणि बंटी पाटील मात्र पळ काढत आहेत. त्यांचा हा कावा सभासदांनी ओळखला असून या निवडणूकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना उमेदवार डॉ. किडगावकर यांनी, राजाराम कारखान्याने नेहमीच सभासदांच्या हिताचा विचार केला आहे असे नमूद केले. 5 वर्षातून एकदा दारात येणाऱ्यांना राजाराम च्या सभासदांना दर महिन्याला 5 किलो साखर 5 रुपये किलो दराने आधीपासूनच मिळते हेही माहीत नाही असा टोला डॉ. किडगावकर यांनी लगावला.
प्रत्येक निवडणुकीत बंटी पाटील येलूर चे सहाशे सभासद आहेत अशी आवई उठवतात आणि 122 गावचे सभासद त्यांचा बाजार उठवतात. सगळ्या सभासदांना वस्तुस्थिती माहिती आहे. कोण आपला कोण परका याची त्यांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळे बंटी पाटलांनी दिशाभूल करू नये असा टोला डॉ. किडगावकर यांनी लगावला. यावेळी विश्वास जाधव, सदाशिव पाटील, शिवाजीराव गायकवाड, सूर्यकांत पाटील, शिवाजी बंगे, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, आनंदराव चौगुले, तानाजी पाटील, आनंदराव लाड, युवराज गायकवाड, सखाराम बंगे, उत्तम पाटील, रंगराव पाटील, नामदेव माने, शिवाजी यादव, बळवंत चौगले यांच्यासह सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
