अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम

नाशिक : सर्वसामान्यांसाठी समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. मात्र या महामार्गावर होणारे अपघात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच आता अपघात रोखण्यासाठी आरटीओने  पुढाकार घेतला आहे. यासाठी आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे.

समृद्धी महामार्गावर एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत अशा 67 वाहनांना आरटीओने परत पाठवले आहे. विशेष म्हणजे, आणखी सात दिवस अशाप्रकारे समृद्धी महामार्गावर आरटीओ विभागाकडून तपासणी सुरूच राहणार आहे.गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे, वाहनांचे टायर गुळगुळीत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. टायर घासलेले असल्याने वेगात वाहन चालवल्याने टायर फुटून वाहनांनाचे अपघात होत आहेत. तर गुळगुळीत टायर असलेल्या वाहनातून समृद्धीवरून प्रवास करू नका, असा सल्ला यापूर्वीच पोलिसांनी दिला आहे. मात्र असे असताना अनेक वाहनचालक टायर घासलेल्या वाहनातून प्रवास करत आहेत आणि त्यातून अपघात होत आहेत. त्यामुळे आता अशा वाहनांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे तुमच्या चारचाकी वाहनाचे टायर घासून गुळगुळीत झालेले असतील तर समृद्धी महामार्गावर जाण्याचे टाळलेलेच योग्य ठरेल, अन्यथा तुम्हाला देखील अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरावे लागेल.

🤙 8080365706