कोल्हापूर : अवैध 29 उमेदवारांचे अपील नामंजूर करण्यात आले असून 29 अवैध उमेदवारांवरून प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी हा निकाल दिला आहे. त्यामुळे अवैध 29 उमेदवारांचे अपील नामंजूर करण्यात आले आहे. या निर्णयाने विरोधी आमदार सतेज पाटील गटाला तगडा झटका बसला आहे.
आजच्या (10 एप्रिल) निकालाकडे लक्ष लागले असतानाच मध्यरात्रीच निकालाच्या प्रती संबंधित उमेदवारांना पोहोचवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाला आता उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आल्यानंतर आता विरोधी गट कोणती भूमिका घेणार? याचीही उत्सुकता आहे.
दुसरीकडे, निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यामुळे, यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून गुरुवार चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी गटातील 29 उमेदवार अवैध ठरल्यानंतर या संघर्षाला आणखी धार येणार आहे.
