
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलिस हवालदार नामदेव यादव यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले.

प्रजासत्ताकदिनी शाहू स्टेडियम येथे होणा-या ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत आणि यादव यांना सन्मानित केले जाणार आहे. राजस्थानमधील कुख्यात बिष्णोई टोळीला जानेवारी २०२० मध्ये किणी टोल नाका येथे जेरबंद केल्याबद्दल सावंत आणि यादव यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले.पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केलेले पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचा-यांना दरवर्षी राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित केले जाते. यंदाची शौर्यपदकप्राप्त पोलिसांची यादी बुधवारी (दि. २५) जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातील ७४ पोलिसांची समावेश असून, कोल्हापुरातील पोलिस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत आणि पोलिस हवालदार नामदेव महिपती यादव यांनाही हा सन्मान जाहीर झाला.
