
मुंबई : मुंबई महापालिकेत मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या रडारवर आहेत. भ्रष्टाचाराच्या 395 प्रकरणांच्या चौकशी साठी मुंबई महापालिकेने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला एकही प्रकरणांत मंजुरी दिलेली नाही. मुंबई महापालिकेच्या चौकशी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 200 बीएमसी अधिकारी 142 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला सामोरे जात आहेत.

142 प्रकरणांपैकी ACB ने 105 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. तर, 37 प्रकरणांमध्ये अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही आहे.भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 17A अन्वये चौकशी सुरू करण्यास मंजुरी देण्याच्या विषयावर धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बीएमसीने 395 प्रकरणांपैकी 377 प्रकरणांमध्ये मंजुरी न देऊन ACB कडून होणाऱ्या भ्रष्टाचाराशी संबंधित चौकशीपासून आपल्या अधिकाऱ्यांचे स्पष्टपणे संरक्षण केले आहे. तर, 18 प्रकरणे BMC च्या वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रलंबित आहेत. याचा अर्थ 395 प्रकरणांपैकी BMC ने एकही मंजुरी दिलेली नाही आणि 95% प्रकरणांमध्ये आधीच मंजुरी नाकारली आहे.
