बनावट नोटा छपाईसाठी कोल्हापूरातून कागद खरेदी ; दुकानाची झाडाझडती सुरू

कळे : बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद, रंग, पट्टी, शिक्के आदी साहित्य कोल्हापूरातील वेगवेगळ्या दुकानातून खरेदी केल्याचे समोर आले आहे. संशयितांना चौकशीसाठी सोमवारी कोल्हापूरात फिरवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

बनावट नोटा तयार करणारा मुख्य संशयित संदीप कांबळेच्या मागे आणखीन सूत्रधार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने यासाठी कोणाकोणाचा आधार घेतला, बनावट नोटा कुठे खपविल्या, सीडीआर , कॉल डिटेल्स यांची तांत्रिक तपासाच्या आधारे कसून चौकशी सुरू आहे.      

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणारी टोळी पकडून जेरबंद केली होती.कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावरशुक्रवारी (ता.२०) ही कारवाई केली होती. संशयित चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (कसबा तारळे), अभिजीत राजेंद्र पवार (गडमुडशिंगी), दिग्वीजय कृष्णात पाटील (शिरोली पुलाची) व संदिप बाळू कांबळे (कळे, ता.पन्हाळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चार लाख ४५ हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटांसह संगणक, प्रिंटर, इतर साहित्य व चारचाकी गाडीसह बारा लाख ६२हजार ४८०रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.      

संशयितांकडून अधिक तपासात तारळे येथील संशयित चंद्रशेखर पाटील याने कळेतील संदीप कांबळे याला अभिजित पवारमार्फत नोटा बनविण्यासाठी लाखभर रुपये रक्कम दिले होते. त्याबदल्यात चार-पाच लाख रुपये बनवून देण्याचे संदीपने मान्य केले होते. दिलेली रक्कम ही उधार स्वरूपात होती, ती परत मागितली असता मला बनावट नोटा दिल्याचे संशयित चंद्रशेखरचे म्हणणे आहे. बनावट नोटा बनविणारा संशयित संदीप कांबळे याची व तारळे येथील मुख्य संशयित चंद्रशेखर पाटील याची थेट ओळख नसल्याचेही समोर आले आहे. अभिजित पवार व संदीप कांबळेची ओळख कशी झाली याबाबत चौकशी सुरू आहे. संशयित दिग्विजय पाटील हा कांही वर्षांपासून चंद्रशेखरच्या गाडीवर चालक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संशयित संदीप कांबळे याला संशयित अभिजित पवार याने बनावट नोटा तयार करण्यास सांगितले. तयार केलेल्या नोटा खपविण्याची जबाबदारीही त्याने घेतली होती. संदीपने पहिल्यांदा नकार दिला होता. दरम्यान, संदीपचे कर्जबाजारीमुळे सगळे मार्ग खुंटले होते. एक महिन्यानंतर  त्याने पवारची ऑफर स्वीकारली. तो रोज मध्यरात्री उशिरापर्यंत घरी यायचा नाही. त्यामुळे त्याचा गल्लीतील लोकांशीही संपर्क कमी राहिला. संशयित संदीपचे वडील अंध आहेत. वृद्ध आई आजही ढाबा, हॉटेलमध्ये धुणीभांडी करते. तर पत्नी रोजंदारीवर कामाला जाते. संदीप सुरुवातीपासूनच आर्थिक उपद्व्याप करत आला आहे. त्याच्या चैनखोर स्वभावामुळे थोडीफार असलेली जमीनही विकायची वेळ  कुटुंबावर आली आहे.

चौकट: भारत सरकारचे चलनी नोट मुद्रणालय नाशिक येथे आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा तपासणीसाठी नाशिक येथील मुद्रनालयात लवकरच पाठविण्यात येणार आहेत.

🤙 8080365706