
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील धुऱ्याचीवाडी-पाटगांव, आडेवाडी-तळेवाडी-भटवाडी-चिक्केवाडी ते कोल्हापूर या 16.200 कि.मी. रस्ता प्रजिमा म्हणून दर्जोन्नती पुर्ण झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार असून यामुळे सदर रस्त्याची कामे होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यातील सदर रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता असल्याने लवकर नुतनीकरण होत नव्हते. या परिसरातील नागरिक अनेक वेळा आमदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत होते. ही समस्या ओळखून आमदार प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगून तो मुख्य अभियंता पुणे यांच्याकडे पाठविण्याबाबत सांगितले होते. तर जिल्हा परिषदेने सुद्धा या हस्तांतरणाबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला होता. शासन दरबारी आमदार आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची अनेक वेळा भेट घेऊन रस्ते हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय काढून धुऱ्याचीवाडी-पाटगांव, आडेवाडी-तळेवाडी-भटवाडी-चिक्केवाडी ते कोल्हापूर रस्त्यांची दर्जोन्नती केली आहे.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर प्रथम त्या भागातील खेड्यापाड्यापर्यंत डांबरी रस्ता पोहचला पाहिजे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू नये आणि रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती व्हावी यासाठी सदर रस्त्यांचा जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. या रस्त्यांची दर्जोन्नती झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच हे रस्ते चकचकीत होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले.