
मुंबई: मुंबईतील वाढत्या गोवर रुग्णांची संख्या लक्षात घेता बांधकामाच्या ठिकाणी, पुलाखाली आणि रस्त्यावर राहणाऱ्या बेघर मुलांसाठी मुंबई महापालिका विशेष गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सोमवार, 26 डिसेंबरपासून राबवणार आहे.

रोजंदारीसाठी आलेल्या मजुरांच्या बालकांसाठी ही मोहीम राबवली जाणार असून त्यासाठी महापालिकेने 6 फिरती पथके तयार केली आहेत.मुंबईत गेल्या काही दिवसांत गोवर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिन्यांच्या बाळापासून ते 15 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने जास्तीत मुलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. परराज्यांतून रोजंदारीसाठी आलेली कुटुंबे बांधकामाच्या ठिकाणी, पुलाखाली, रस्त्यावर आश्रय घेतात. अशा कुटुंबातील मुलांसाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी महापालिकेच्या 6 फिरत्या पथकांकडून ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
