
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती ३ जानेवारीपर्यंत कायम ठेवावी, यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने सीबीआयला याबाबत अर्ज दाखल करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी आज ठेवली आहे.

न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी जामिनावर सुटका केली. मात्र, न्यायालयाने स्वत:च्याच आदेशावर १० दिवस स्थगिती दिली. शुक्रवारी सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सुनावणी जानेवारी २०२३ मध्ये ठेवली. सीबीआयतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायालय बसत नसल्याने जानेवारीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती ३ जानेवारीपर्यंत कायम करावी. देशमुख यांच्यातर्फे ॲड. अनिकेत निकम यांनी आक्षेप घेतला. त्यावर न्यायालयाने सिंग यांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले.
