
मुंबई : कोरोना महामारीचा दोन वर्ष सामना केल्यानंतर जगातील सगळ्याच देशांची आर्थिक व्यवस्था हळूहळू रुळावर येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगभरात मंदीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्यास सुरुवात केलीय. टि्वटरनं कर्मचारी कपात केल्यानंतर अनेक बड्या आयटी कंपन्यांनीसुद्धा कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकर्ड (एचपी)देखील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
एचपी कंपनी पुढील तीन वर्षांत 6 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचं नियोजन करत आहे. पर्सनल कॉम्प्युटरची घटती मागणी, आणि सातत्यानं कमी होत असलेला महसूल लक्षात घेऊन कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय रोजगार कायद्याचं संरक्षण मिळणार का? गेल्या काही दिवसांपासून अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. मेटा आणि ॲमेझॉन यांनी अंदाजे 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे.
