
भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी आता क्रिकेटपाठोपाठ आपला मोर्चा फुटबॉलकडे वळवला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी मुंबई इंडियन्सचे मालक असलेल्या अंबानी व त्यांच्या रिलायन्स समूहाने थेट, इंग्लंडमधील प्रीमियर लीग स्पर्धेतील लिव्हरपूल फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
असे झाल्यास इंग्लंडमधील या प्रतिष्ठित स्पर्धेत संघ खरेदी करणारे ते दुसरे भारतीय ठरतील.प्रीमियर लीग इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक असलेल्या लिव्हरपूल संघाची मालकी सध्या फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे आहे. मात्र, ते ही मालकी विकण्याच्या प्रक्रियेत असल्याचे समोर येतेय. त्यामुळे जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी हा क्लब खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अंबानी यांनी 12 वर्षांपूर्वी सहारा समूहासह हाच क्लब खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलेली. मात्र, काही कारणास्तव हा करार पुढे जाऊ शकला नव्हता. परंतु, आता हा करार होण्याची शक्यता वाढली आहे.
