
मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या एका दिवसाच्या मुलाला आईने एक लाख रूपयांमध्ये विकले आहे. या प्रकरणी बाळाची खरेदी करणाऱ्या नर्ससह पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत.
दोघींचीही पोलिस चौकशी करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची खरेदी करणारी महिला ही पेशाने नर्स आहे. तर, मुलाची विक्री करणारी संशयित आई ही कोणतंही काम करत नव्हती. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच त्याची विक्री करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ती माहिती मिळवत होती. माहिती मिळवत असताना तीचा संशयित आरोपी नर्ससोबत संपर्क झाला. या बाळाला मी विकत घेऊन असे सांगून संशयित महिलेच्या प्रसुतीनंतर दुसऱ्याच दिवशी नर्सने ते बाळ एक लाख रूपयांमध्ये विकत घेतले. या दोघींचा संपर्क झाल्यानंतर नर्स देखील बाळाची विक्री करण्यासाठी पुढे ग्राहक शोधत होती. ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवत सापळा रचला आणि संबंधित नर्स आणि आईला बेड्या ठोकल्या. दोघींवरही आपीसी कलम 370 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींना देखील बेड्या ठोकल्या आहेत.
