
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे निशाण फडकविणारे शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार सुहास कांदे नाराज आहेत का ? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना आमदार कांदे यांनी उपस्थिती लावली नव्हती. इतकंच काय शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांची अनुपस्थिती राहिल्याने सुहास कांदे नाराज आहेत का ? याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र यावर स्वतः सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी मी नाराज नाही हे ठासून सांगत असतांना कांदे यांनी नाराजीचा पाढाच वाचला आहे. सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघाचे आमदार असून ते सध्या शिंदे गटाचे आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तिय असलेले आ.सुहास कांदे यांनी राज्याचे बंदरे व खणीकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या एकतर्फी कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली ‘ नाराजी ‘ व्यक्त केली.
