
गारगोटी: राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 4 तीर्थक्षेत्रांना शासनाकडून ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या चारही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील भक्तांच्या भावनेशी जोडलेल्या गेलेली तीर्थक्षेत्रे सोयीसुविधांनी युक्त असावी अशी मागणी होती. ही चार ही देवस्थाने जागरुक असून या मंदीरांना यात्रा काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्त भेट देत असतात. त्यांची योग्य प्रकारच्या सेवा उपलब्ध होणेसाठी गेली अनेक दिवसांपासून यामंदीरांना ब वर्ग दर्जा मिळणेसाठी पाठपुरावा सुरू होता. त्याअंतर्गत नव्याने मतदार संघातील चार तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जवळपास प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरुन केली जावू शकतात. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांसाठी निवास व्यवस्था व अन्य सुविधा देवून विकासात्मक बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
यामध्ये मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छता गृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभिकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्यातील राधानगरी शहरातील अंबाबाई देवालय, राधानगरी, श्री गुडाळेश्वर मंदीर, गुडाळ, श्री स्वामी समर्थ देवालय, बारडवाडी-जोगेवाडी व भुदरगड तालुक्यातील श्री दत्त मंदीर, शेणगांव मंदीरांचा समावेश आहे.
