कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हिंगोली येथे या पदयात्रेमध्ये येत्या (शनिवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

दरम्यान भारत जोडो यात्रेत कोल्हापुर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार कार्यकर्ते हिंगोलीला रवाना झाले आहेत. येत्या (शनिवारी) सकाळच्या सत्रात हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी तालुक्यातील लक्ष्मी फिलींग स्टेशन, शेवळागाव या मार्गावर हे कार्यकर्ते भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची सर्व व्यवस्था कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
काल (बुधवारी) आ.सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांनी ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची व्यवस्था केली आहे त्या हिंगोली येथील तिरूमला लॉन्स, मधुर विथ पॅलेस, साई रिसॉर्ट येथील विश्रांती, भोजनाची ठिकाणची पाहणी करून काही महत्त्वाच्या सूचना केल्या. या यात्रेत सहभागी होणाऱ्या कोल्हापूर जिल्यातील कार्यकर्त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थेवर आमदार सतेज पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. आ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळचे संचालक बयाजी शेळके,सचिन चौगले, माँटी मगदूम,जे.के. पाटील,विनायक सूर्यवंशी,एस. के. शिंदे यांची टीम गेली १५ दिवस हिंगोली येथे नियोजनात व्यस्त आहे.
या पदयात्रेत सहभागी कोल्हापूरचे कार्यकर्ते भगवे फेटे, टी शर्ट घालून उत्साहात सहभागी होणार आहेत. लेझीमपथक, ढोलताशा या पारंपारीक वाद्यासह मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, तसेच कुस्तीची प्रात्यक्षिके या पदयात्रा या मार्गावर दाखवण्यात येणार आहेत.