कसबा बावडा (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे पदार्थ विज्ञान विभागाच्यावतीने आयोजित ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या रणजित पांडुरंग निकम याने प्रथम स्थान पटकावले आहे.
पुणे विद्यापाठाच्या भौतिकशास्त्र विभागात पदार्थ विज्ञानावरील ‘अॅडव्हान्स मटेरियल सिंथेसीस कॅरेक्टरायझेशन अॅण्ड अॅप्लीकेशन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत २५० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या परिषदेमध्ये झालेल्या पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये “फोटो व्होल्टाईक मटेरियल’ या विभागात रणजित पांडूरंग निकम (संशोधक विद्यार्थी) याने सादर केलेल्या ‘स्टडी ऑफ अॅनिअलिंग ऑन केमिसिंथेसाईज्ड कॅडमियम सेलिनाईड इन फोटो ईलेक्ट्रोकेमिकल सेल प्रापर्टीस’ या विषयावरील पोस्टरला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या विषयातील तज्ञ संशोधक/ वैज्ञानिक यांनी केलेल्या परीक्षणानंतर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या रणजीत निकम यांना प्रथम क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले. परितोषक वितरण सोहळा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बी. के. जैन यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख संदेश जाडकर व समन्वयक डॉ. हबीब पठाण, डॉ. शैलेंद्र दहीवडे यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती.
रणजित निकम यांना विभाग प्रमुख व रिसर्च डायरेक्टर डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. जे. एल. गुंजकर, डॉ. उमाकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. लोखंडे यांनी निकम यांचे अभिनंदन केले.