कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना इंडियन चेंबर ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर (आयसीएफए) कडून “इंडिया ॲग्री बिझनेस अवॉर्ड – 2022” जाहीर झाला आहे. ‘फार्मिंग सिस्टीम’ बाबतच्या अभिनव प्रयोगासाठी डॉ. पाटील यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून 9 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

जागतिकीकरणामुळे गेल्या 30 वर्षांत व्यापार आणि कृषी व्यवसाय अनेक पटींनी वाढले आहेत. भारतीय शेतीच्या उत्पादनकेंद्री ते बाजारपेठेवर आधारित व्यवस्थेच्या परिवर्तनाच्या या प्रवासात लाखो व्यक्ती, संस्था आणि उद्योगांनी उत्प्रेरक भूमिका बजावल्या आहेत. कृषी व्यवस्थेत असीम योगदान देणाऱ्या व्यक्ती संस्थाचा ‘आयसीएफए’ कडून राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्’ ने सन्मानित केले जाते.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील 15 सदस्यीय उच्चाधिकार समितीकडून यावर्षीच्या पुरस्कारार्थींची निवड केली आहे. डॉ संजय डी. पाटील यांनी तलसंदे परिसरात 20५ एकर जमिनीवर विविध पीक पद्धती, आधुनिक उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान, पाणी, खते व किड़नाशकांचा समतोल वापर व विविध राबवलेल्या अभिनव प्रयोगांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
डॉ. संजय पाटील यांनी विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आत्तापार्यंत ‘वनश्री पुरस्कार’, ‘कोल्हापूर भूषण’, ‘राष्ट्रीय शिक्षण सन्मान’, ‘कृषीनिष्ठ पुरस्कार’, ‘इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र ॲवार्ड’, ‘विद्याभारती अवार्ड’, ‘कोहिनूर ऑफ इंडिया ॲवार्ड’, ‘राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार’, ‘नॅशनल एज्युकेशन लीडरशिप ॲवार्ड, ‘भारत गौरव ॲवार्ड, ‘आयएसटीई’ नवीदिल्लीचा “जीवनगौरव” पुरस्काराने डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे.
