हिंगोली (प्रतिनिधी) : पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी करीत हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यलयात तोडफोड केली. कार्यालयात कोणीही नसताना ही तोडफोड करण्यात आली आहे.बोगस पंचनामे आणि बनावट सह्यांच्या आधारे पीकविमा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक पीडित शेतकऱ्यांची नुकसानीच्या तक्रारी पिकविमा कंपन्याकडे दिल्या. परंतु पिकविमा कंपनीच्या वतीने परस्पर पंचनामा केले जात आहेत. तर बोगस पंचनामे तयार करून बनावट सह्या करत अहवाल दाखल केला जात आहे. या अहवालांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा अत्यल्प स्वरूपात दाखवले जात आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालेले असताना पिकविमा कंपन्या बनावटपणा करत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आमदार बांगर यांच्याकडे व्यथा मांडल्या आणि बांगर यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले. परंतु त्यांनी येण्यास टाळाटाळ केली. अखेर आमदार बांगर यांनी थेट पीकविमा कंपनीचा कार्यालय गाठलं त्या ठिकाणी अधिकारी नसल्याने आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले. यावेळी आक्रमक झालेल्या आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. अनेक शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसोबत आमदार बांगर यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.