नवी दिल्ली वृत्तसंस्था : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याची पुष्टी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज (शुक्रवार) केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली आहे.

अशोक गेहलोत यांनी केरळमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की “मी त्यांना अनेकवेळा विनंती केली की त्यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष व्हावे, ही सर्वांची इच्छा मान्य करावी. मात्र त्यांनी मला सांगितले की, यंदा गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभा राहणार नाही, असे त्यांनी ठरवले आहे.”
याचबरोबर “राहुल गांधींनी हे देखील सांगितले की मला माहीत आहे, सर्वांना वाटतं मी पक्षाध्यक्ष व्हाव. मी सर्वांच्या इच्छेचा आदर करतो. परंतु काही कारणसाठी आम्ही ठरवलं आहे की यंदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबातील नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करावी.”
पक्षाध्यक्षपदासह काँग्रेसमधल्या पक्षांतर्गत निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. ही निवडणूक देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची धुरा कुणाकडे जाणार हे स्पष्ट करणारी असेल. राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे. तब्बल दोन दशकांनी होऊ घातलेल्या या निवडणुकीची अधिसूचना काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी जारी केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केरळमधील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शशी थरूर हे दोघे या पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.