तब्बल ७० वर्षांनंतर चित्त्याचे भारतात पुन्हा आगमन

नवी दिल्ली वृत्तसंस्था भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं आज पुन्हा आगमन झाले. तब्बल ७ दशकांनंतर चित्त्याचं मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन झाले. पाच मादी आणि तीन नर अशा एकूण आठ चित्त्यांना विशेष कार्गो फ्लाइट बोइंग-७१७ मध्ये आणण्यात आले असून ते ग्वाल्हेरमध्ये उतरले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना १० किलोमीटर पसरलेल्या भागात सोडण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

एका वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चित्त्यांना एका महिन्यासाठी लहान प्रदेशात ठेवले जाईल आणि यानंतर दोन महिन्यांसाठी परिसराची ओळख होण्यासाठी मोठ्या भागात सोडले जाईल. यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल.प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियातून या आठ चित्त्यांना आणण्यात आले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने यासंबंधी एक ट्वीट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले चित्ते सोडले आहेत. चित्ता हा एकमेव मोठा मांसाहारी प्राणी आहे जो भारतातून पूर्णपणे नष्ट झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त शिकार आणि चित्त्यांच्या अधिवासाचे नुकसान. मात्र, देशात पुन्हा चित्ते आणणे हे जंगलांच्या परिसंस्थेसाठी वरदान ठरू शकते.