मुंबई वृत्तसंस्था : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळावा नेमका कुणाचा? यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपली भूमिका मांडली आहे.
मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे ३०-४० आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.