मुंबई: भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात एक्सपर्ट आहे’, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर केला आहे. तसेच भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

सुशील मोदी यांनी ‘महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला’, असे वक्तव्य केले होते.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा खासदार सुशील मोदी यांच्यावर निशाणा साधला. “धोका देण्याचा पायंडा. ज्यांच्यामध्ये हा दुर्गुण आहे, तो भारतीय जनता पार्टीमध्ये मजबूतीने मुरला आहे. त्याचा मुरांबा झाला आहे. याबाबतची अनेक उदाहरणे आपण काश्मिर, हरियाणापासून नितीश कुमारांपर्यंत पाहिली”, अशी टीका सावंत यांनी केली.

पाठीत सुरा खुपसण्यात कोण एक्सपर्ट आहे? असा सवाल उपस्थित करत, मेहबुबा मुफ्ती यांच्यांच्यासोबत जाताना कोणाच्या पाठीत सुरा खुपसला, हिंदुत्वाच्या, 370च्या की काश्मिरमधील हिंदू बांधवांच्या पाठीत सुरा खुपसला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवते : शरद पवार
जूनमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर दोनच महिन्यात बिहारमध्येही सत्तांतर झाले. दोन्हीकडे भाजपाच्या भूमिकेवरचे टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही, भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवते, अशी टीका केली.
