मुंबई वृत्तसंस्था : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला . राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त मतं पडतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरलेला दिसत आहे.

महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना 181 तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. राज्याच्या 283 आमदारांनी मुर्मू यांना मत दिलं, यातली 279 मतं अधिकृत धरण्यात आली. रमेश लटके यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 287 एवढी आहे. यातले नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. तर भाजपचे लक्ष्मण जगताप आजारपणामुळे मतदानाला येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी हे कोर्टात दोषी आढळल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले.