नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्या गटाला ‘शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे.
शिंदे गटाचे संसदीय पक्षाचे नवे गटनेते राहुल शेवाळे यांनी काल रात्री निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाला शिवसेनेच्या ५० आमदारांचा पाठिंबा आधीच मिळालेला आहे. यामुळे तृतीयांशपेक्षा जास्त शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भेट घेत शिवसेनेच्या १२ लोकसभा खासदारांचेही समर्थन असल्याचा दावा केला. तसे पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्षओम बिर्ला यांना दिले. एवढेच नव्हे, शिंदे यांनी राहुल शेवाळे यांची लोकसभा संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली, तर भावना गवळी या मुख्य प्रतोद कायम राहिल्या. लोकसभा अध्यक्षांनीही राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व १८ खासदारांना भावना गवळींचा व्हीप मानावा लागेल, असे जाहीर केले होते. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.