मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात आहे.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. राज यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी या शुभेच्छांचा स्वीकार करत फडणवीसांनी आपण राज ठाकरेंना भेटायला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या भेटीत फडणवीसांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र, राज ठाकरे व भाजपची वाढलेली जवळीक पाहता भेटीत राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिका शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले होते. सेनेचे हक्काचे मराठी मतदार मनसेकडे गेले होते. आगामी निवडणुकीतही याचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. लवकरच राज्याचा मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. त्यापुर्वीच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने मनसेलाही मंत्रिपद मिळणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, या भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, या भेटीत काय चर्चा झाली याची मला माहिती नाही.