कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे समाजभिमुख,व पारदर्शी कारभार यासाठी आग्रही होते. त्यांचे हेच समाजभिमुख विचार व पारदर्शी कारभार नगरपालिकेत नेण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कागल येथे दूधगंगा डेअरीच्या सभागृहात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाश्वत विकासाला प्राधान्य दिले. त्यांनी व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिक हिताची कामे केली. त्यामुळे कागलमध्ये त्यांनी उभारलेली कामे आजही आदर्शपणे उभी आहेत. मात्र विरोधकांकडून व्यक्तीगत हिताचे राजकारण केले जात आहे. त्याला मुठमाती देण्यासाठी स्व. राजे विक्रमसिंहराजे घाटगे यांना अपेक्षित असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आदर्श कागल घडविण्यासाठी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे म्हणाल्या, आजपर्यंत राजकारणात व समाजकारणात महिलांचेकडे केवळ केवळ मतदार म्हणूनच पाहिले जाते. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवून स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभारण्याचे कार्य सुरु आहे. महिला सक्षमीकरणास नगरपालिकेच्या माध्यमातून चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी महिला आघाडीवर असतील.
यावेळी राजे बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, नगरसेविका विजया निंबाळकर ,भाजपा शहराध्यक्ष सुशांत कालेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, माजी चेअरमन आप्पासो भोसले, आप्पासो हुच्चे प्रमोद कदम उमेश सावंत आदी उपस्थित होते .