कोल्हापूर : आपत्ती काळात समाजाला मदतीचा हात देण्यासाठी रोटरी नेहमीच तत्पर असते. रोटरीने, दिलेले पाणी उपसा पंप ज्या-ज्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणी महापालिकेने तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. रोटरीच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेस पाणी उपसा पंप प्रदान कार्यक्रमात माजी मंत्री सतेज पाटील बोलत होते.

कोल्हापुरातील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ पूणा वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमान कोल्हापूर महानगरपालिकेस पाणी उपसा पंप प्रदान करण्यात आले. केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी, रोटरी जिल्हा सिनर्जी प्रोजेक्ट अंतर्गत विलो कंपनीच्या सहकार्याने 1 कोटी रुपये किमतीचे 4 पाणी उपसा पंप महानगरपालिकेस देण्यात आले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि रोटरीचे भावी संचालक टी.एन. सुब्रमनियन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, विलो पंपचे मिलिंद खरे, रोटरी सनराईजचे माजी अध्यक्ष सचिन मालू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री सतेज पाटील यांनी, रोटरीने नेहमीच कोल्हापूरच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. कोरोनाच्या कठीण काळात देखील चाळीस लाख रुपयांचे बेड रोटरीने उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. समाजात ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी तत्परतेने मदत पोहोचवण्याचे काम रोटरी करत असल्याचे गौरव उद्गगार त्यांनी काढले. २०१९ आणि २०२१ साली आलेला महापूराच्या परिस्थितीमध्ये गाळ युक्त पाणी साचून राहिल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती असते. मात्र अशा पाण्याचा उपसा करण्यासाठी अवघ्या दोन महिन्याच्या काळात विलो पंपच्या सहकार्याने रोटरीने एक कोटीचे पंप महापालिकेला दिल्याबद्दल माजी मंत्री पाटील यांनी रोटरी प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर ज्या ज्या ठिकाणी हे पाणी उपसा पंप लागतील त्या ठिकाणी महानगरपालिकेने तातडीने पंप उपलब्ध करून द्यावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी रोटरीचे भावी संचालक टी.एन. सुब्रमनियन यांनी, दोन जिल्ह्यातील रोटरी क्लबनी एकत्र येऊन विलो च्या सहकार्याने हा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श घालून दिल्याचे सांगितले. समाजकार्यासाठी रोटरी परिवार नेहमीच तत्पर असून आम्ही समाजसेवक म्हणूनच रोटरी मध्ये काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. रोटरी सनराईजचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी, या उपक्रमा संबंधी माहिती दिली. रोटरीयन राहुल कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी रोटरी 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वेंकटेश देशपांडे, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, पंकज शहा, नासीर बोरसदवाला, भाग्यश्री भिडे, ऋषिकेश खोत, कविता कोठारी, चारू श्रोत्री, महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, प्रा. डॉ. महादेव नरके, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे पदाधिकारी संचालक व रोटरीयन्सआदी तसेच विलो मॅथर अँन्ड प्लॅट पंप्स आदी मान्यवर उपस्थित होते.