चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पातळी आज दिवसभरात वाढल्याने क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गावातील नागरी वस्तीपासून पुराचे पाणी अद्याप दूर आहे कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झालेली नाही. संपर्क करणारे तीनही रस्ते खुले आहेत. दरम्यान आज दिवसभरात पावसाचा जोर आणि पुराचे पाणी वाढू लागल्याने प्रयाग चिखली येथील काही ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून आपल्या दुभत्या जनावरांसहीत सोनतळीच्या दिशेने पावले वळवलीत आज दिवसभरात ५० वर कुटुंबानी जनावरांसहित सोनतळीच्या दिशेने स्थलांतर केले.

काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोनतळी येथे जनावरांसाठी छावण्या करण्याचा निश्चय केला आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी आम्रपाली कोठारे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गावामध्ये जनावरे स्थलांतरित करण्यासाठी आव्हान केलेनुसार आज पासून जनावरे हलवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या गावामध्ये सुमारे बाराशे कुटुंबे तर 5000 वर लोकसंख्या आहे. तर सुमारे एक हजार दुभती जनावरे आहेत त्यापैकी 50 कुटुंबे आणि शंभरावर जनावरे दोन दिवसात स्थलांतरित झाली आहेत.

उर्वरित लोक जनावरांसह स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत. पुराचे पाणी वाढत असले तरी गावाला जोडणार तीन रस्ते अद्याप खुले आहेत गाव वस्तीपासून पुराचे पाणी अद्याप दूर आहे. ग्रामस्थांच्या अंदाजानुसार अजून कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ अंदाज घेऊन गुरुवारी व शुक्रवारी स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत.