मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारासह बंड करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. कायद्याने लढा देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसू शकतो. धनुष्यबाण चिन्ह गमावल्यास नव्या निवडणूक चिन्हाची तयारी ठेवा, अशी सूचना ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केली.
यापूर्वी एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिल्यामुळे आता भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आणि शिवसेनेते सुनील प्रभूंना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून हा निर्णय दिला. सेनेतून फुटलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट प्रयत्न करणार आहे. त्यात त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र दुर्दैवाने यात अपयश आले तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर ते सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.