‘त्या’ आमदारांना अपात्रतेची नोटीस

मुंबई : १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे, अशा मागणीचे पत्र शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. त्यात या आमदारांना ४८ तासांच्या आत त्यांच म्हणणे मांडवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

या दरम्यान बंडखोर आमदारांना आपली भूमिका मांडण्यासाठी संधी असेल, मात्र या कालावधील त्यांनी मत मांडल नाही तर त्यांना अपात्र ठरवले जाईल.

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यात आला, यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या विषयावर सलग चार तास सविस्तर चर्चा झाली. यानंतर झिरवळ आणि महाधिवक्ता यांच्यात सलग एक तासाच्या बैठक झाली, या बैठकीत अखेर बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बंडखोर आमदारांना नोटीसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांनी दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

बंडखोर आमदारांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा दावा केला होता. यात अविश्वासाच्या ठरावाचा धागा पकडत आता नरहरी झिरवळ आमच्यावर अपात्रतेची कारवाई करु शकत नाही, असे मत बंडखोर आमदारांनी मांडलेय. यामुळे आता भाजपसह महाविकास आघाडी सरकारच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत.