गुवाहाटी : एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले.
रॅडिसन ब्लू हॉटेलच्या दारात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अचानकपणे धडकले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार असल्याने याठिकाणी आसाम पोलीस आणि निमलष्करी दलाची सुरक्षा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये शिरता आलेले नाही. मात्र तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन हॉटेलवर धडकत येथून शिवसेनेच्या आमदारांना निघून जाण्यास सांगावे, अशी मागणी केली. आसामध्ये पूर परिस्थिती असतांना त्यांना मदत करायचे सोडून भाजप राज्याबाहेरील आमदारांना सुरक्षा पुरवत आहे. या आमदारांची खरेदी विक्री बंद करा, स्थानिकांना मदत करा, अशी घोषणाबाजी करत शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले असलेल्या गुवाहाटी येथील हॉटेल रॅडीसन समोर आंदोलन करण्यात आले. स्थानिक पोलिस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना अक्षरक्ष: उचलून पोलिसाच्या वाहनात बसवले.