मुंबई : एकनाथ शिंदेंच्या गोटात दिवसागणिक आमदार वाढत चालले आहेत. सध्या एकनाथ शिंदेंच्या गोटात जवळपास ४१ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार राहिले आहेत.
शिवसेनेचे मालाड मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू, राजापूरचे आमदार राजन साळवी, चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर, विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक, भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर, पाचोऱ्याचे आमदार कैलास पाटील, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच शिल्लक राहिले आहेत. इतर सर्व आमदार जवळपास शिंदेंच्या गोटात सामील झाले आहेत. तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदेंच्या तंबूत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेंकडे शिवसेनेचे ४१ आमदार आणि अपक्ष सहा असे एकूण ४७ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अजूनही अनेक आमदार शिंदेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून मंत्री असलेले अनेक जण सहभागी झाले आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासारखे अनेक मंत्री सहभागी झाले आहेत.
दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पायउतार होण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील त्यांचे वर्षा अधिकृत निवासस्थान रिकामे केले आणि वांद्रे येथील त्यांच्या खासगी मातोश्री निवासस्थानी राहायला गेले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गोटात आमदार उदय सामंत, आमदार गुलाबराव पाटील, आमदार शंभुराज देसाई, स्वत: आमदार एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार दादा भुसे, आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संदीपान भुमरे, असे मिळून दहा मंत्री हे शिंदेंच्या गटात आहेत.